Tuesday, November 6, 2012

अरे, देवा !

हृदयातच कोंडून घेणाऱ्या देवा! कधीतरी बाहेर येत जा ।
कोंडलेला श्वास तुझा अन माझाही, मोकळा करून घेत जा ।।

माझ्या हृदयातील अंधारात, एका बंद्यासारखा राहतोस ।
शेजाराला माझे षडविकार, तसेच राहू देतोस  ।।
अरे, तुझी राहायची जागा तरी, स्वच्छ करून घेत जा ।

कोंडलेला श्वास तुझा अन माझाही, मोकळा करून घेत जा ।।१।।

मी जातो हरवून वादळात, तेव्हा तुला तर असते ना दृष्टी!
अनाथाचा नाथ म्हणतोस , का नाही बनत माझी काठी ।।
अरे, खूप खोल आहे हा भवसागर, बुडत्याला आधार देत जा ।

कोंडलेला श्वास तुझा अन माझाही, मोकळा करून घेत जा ।।२।।

जेव्हा मला पडते खरी गरज, तेव्हाच दूर पळतोस ।
जीवा-शिवाचा खेळ म्हणे; मग एकटा का खेळतोस?
अरे, तु पण एखाद्या वेळी, खेळाचा डाव घेत जा ।

कोंडलेला श्वास तुझा अन माझाही, मोकळा करून घेत जा ।।३।।

मलाही मान्य आहेकी, तू सर्वांच्या हृदयी राहतोस ।
सृष्टी एवढा पसारा तुझा, तूच सर्व काही पाहतोस ।।
अरे, 'मी पण तुझाच अंश आहे', हि जाणीव तेवढी देत जा ।

कोंडलेला श्वास तुझा अन माझाही, मोकळा करून घेत जा ।।४।।




Friday, October 5, 2012

अहंकाराचा वारा

{परम पूजनीय दादाजी यांनी अनेकदा हा दृष्टांत सांगितला आहे. मी त्यालाच कवितेच्या रुपात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.}


कुंभार कुणी सुजाण
इराण देशी वसे
भार वाहण्या गाढव एक
त्याच्या सदनी असे १

कुरूप ते गाढव एकदा
वाहून नेतसे भार
नवल घडले, तया पाहण्या
गर्दी दाटली फार २

उभे दुतर्फा जन मार्गी
अर्पिती पुष्पहार
मनास वाटले श्वापदाच्या
मजसीच हे नमस्कार ३ 

महत्ती माझी आज उमगली
गाढव चिंतीतसे मनी
गुणवत्तेचे मम प्रतिभेचे
मूल्य होतसे जनी ४

केसरी तुल्य काम माझे
हे विश्वहि मजपुढे सान
पद-प्रतिष्ठा माझीच मोठी
नातरी कुणास हा मान? ५

अशी हि मिरवणूक त्याची
मंदिरा-समीप आली
धन्याने भाडे घेवूनी
मूर्तीस उतरविले खाली ६

स्वतःस वळवून ऐटीत
खर तो निघता झाला
प्रसाद तेव्हाच चाबकाचा
धन्याने दिधला त्याला ७ 

"अरेरे!" फटकार्याने त्या
गाढव मनी विव्हळले
'मान मजला न इतुका होता
पृष्टीच्या पालखीस' हे कळले ८

'गर्व नसावा स्वतःवरती'
'गर्वाचे ते  घर खाली'
'साथ रामाची भुलू नये'
हि अक्कल त्याला आली ९

साहस

वर्षानुवर्षे  मी  कष्टलो
फलद्रूप जरी ते नव्हते
प्रत्येक अपयश माझे
पायरी यशाची होते १

निश्चय असे ठाम मन्मनी
जरी का मी पामर जीव
घ्यायचीच अनंत भरारी
का करावी स्वतःची कीव? २

क्षणिक प्रत्युत्तर स्थितीचे
मजला न रोखू शकले
हि उत्तुंग भरारी पाहून
मग अंतराळ हि झुकले ३

तेच बळ आणि तेच पंख
मी 'साहस' फक्त भरले
परीक्षेस आले सत्वाच्या
ते सारे अडथळे हरले ४

पोळ्याच्या दिवशी

{पोळ्याच्या दिवशी शहरात चाललेला धिंगाणा पाहून मी खूप दु:खी झालो होतो. मनात दाटलेल्या  त्या भावनांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न या कवितेत केला आहे.}

का कुठवर कुणाला किती कसे तोलू?
अंतरीचे जे बोचती ते बोल कसे बोलू?

एकेक लाट आता उभारी घेत आहे
झुळूक मंद ती हि असह्य होत आहे
धुंद अनोख्या तमात कशी नाव पेलू?
अंतरीचे जे बोचती ते बोल कसे बोलू?

मला टोचतो आहे मत्त नाच्यांचा बाजार
पवित्र परंपरेचा पहा कसा घेतला आधार
कर्कश गोंधळास का उत्सव मानुनी झेलू?
अंतरीचे जे बोचती ते बोल कसे बोलू?

बंदिस्त तरी श्रीमंत आधुनिक देव झाला
'मती ही न' तयांच्या भक्तीस पूर आला
गाभार्यात घडे पाप, ते कसे दूर घालू?
अंतरीचे जे बोचती ते बोल कसे बोलू?

कुठे ते दीपस्तंभ? ध्येय देवूनी का पळाले?
अर्ध्यावरी एकट्याचे त्राण माझे गळाले
वादळात 'प्रकाशाकडे'' कसा मार्ग चालू?
अंतरीचे जे बोचती ते बोल कसे बोलू?

गणेशोत्सव_आधुनिक

राज्य  मंडळाचे  आले ,  तुला नाही भाव
निघ गौरीसुता आता , सोड तू हे गाव

लोकमान्य टिळक यांची ,  होती दूर-दृष्टी
लोक संघटीत बनले , स्वातंत्र्य प्राप्ती साठी
त्याच महा नायकाचे , कुठे आज नाव?
निघ गौरीसुता आता , सोड तू हे गाव १

तरुण झाला व्यसनाधीन , देती लोक पैसा
किती पुण्य आणि पाप , हिशेब याचा कैसा
कळेना या गोंधळात , कोण चोर साव?
निघ गौरीसुता आता , सोड तू हे गाव २

खरी परंपरा गेली , आधुनिक आले
तूच पहा गजवदना , कसे काय झाले
पवित्र हि संस्कृती माता , सोसितसे घाव
निघ गौरीसुता आता , सोड तू हे गाव ३

Saturday, November 26, 2011

वणवण


रखरखती तप्त धरा, अन कमरेला पोर
चैताच्या या उन्हाला, आला आगीचा जोर....

रिकामीच घागर, पण डोळ्यातून पाणी
'घोटाच्या' शोधात, फिरे अनवाणी....

दिसेल का झरा? जरा अंधुकच आशा
उपाशी लेकुरवाळी, तिची का हि दशा?....

दैवरेखा या वेलीच्या अशा का रेखल्या?
फुल उमलण्याआधी पाकळ्याही  सुकल्या....

हे पाण्याचे डबके, चल असुदे गढूळ
कितीतरी दिवसांची, भरून घे चूळ....

डुंबून घे आज, यातच मनसोक्त
तुझ्या आयुष्यात आहे,'वणवण'च फक्त....

Thursday, November 24, 2011

सूर मनीचे

सा'त सुरांची साथ घेउनी,
रे'खिले चित्र स्पष्ट बोलके.
ग'र्द रंग हे दिले उधळून,
म'नास देती माझ्या झोके.

प'कडला मी सूर असा कि,
ध'ग आगीची विझून गेली.
नि'राशता घेऊन मनीची,
सां'जवेळ ती झुकून गेली.
---अरुण झिंजुर्डे---
२५/११/२०११

Sunday, November 20, 2011

मनपाखरू

तुला बघितले तेव्हा,
मनपाखरू गेले गगनाला
काय करू तुझ्यासाठी?
लागली चिंता मनाला १

तुझ्या आवाजाने त्याला,
कसली आली धुंदी
भावनांचे मेघ दाटले,
विसरून गेलो फांदी २

काय करावे सुचेना,
मग छान कविताच केली
पागल मनाला शेवटी,
शब्द'साधनाच' कामी आली ३

Friday, November 18, 2011

---फुल---(निर्माल्यातील)

मलाच नाही समजत ,काय समजू स्वतःला?
साथ होती भाग्याची? की दुर्दैव आलं वाट्याला?

काही क्षणाच आयुष्य माझं, पण सुगंधान भरलेलं
टवटवीत मुखवटा घेऊन,काट्यातही झुरलेलं

बसलो 'श्रीं' च्या माथ्यावर,तोच आनंदाचा क्षण
कोण पुण्य केले मी?विचारू लागले मन

पण दुसर्याच क्षणी , कचऱ्याचा ढीग पहिला
पाप-पुण्याचाही विचार, मग अधुराच राहिला

नशीब कि दुर्दैव माझे? काय म्हणू मी याला ?
उत्तर द्या तुम्हीच, निर्माल्यातील फुलाला. 

Wednesday, September 28, 2011

बालिका दिन

आज एकदाची जन्मलीस तू, मुलगी म्हणून माझ्या पोटी
आत्ताच आळविले मी, अंगाई गीत तुझ्यासाठी….

मी तुला संपवायचं ठरवलं, तेव्हा तू मला सावरलंस
अंकुर उपटू नये म्हणून, क्रूर हातांना आवरलंस….

विसरलेच होते मी स्वतःला, माझ्यातल्या या मातृत्वाला
आणि माझ्यात वाढणाऱ्या, एका जिवातील जीवाला….

तुझ्या बोबड्या बोलांनी, मला वेळीच जागं केलं
भ्रूण हत्येच्या पापापासून, एका क्षणातच दूर नेलं….

'सोनिया'ची 'प्रतिभा' लाभो, 'आशा' एकच जीवनी
'कल्पने'ची भरारी घे अन, बन तू 'तेजस्विनी'…. 

Saturday, August 28, 2010

एकेकाळची मैत्री

अगदी कालपर्यंत हे सारे माझे मित्रच होते
पेंद्यासुदाम्यासारखी, साथ निभावत होते।। १ ।।

माझ्या डोळ्यात अश्रू, जर आघात यांना झाला
अनोख्या मैत्रीचा असा, प्रत्यय मीही दिला ।। ३ ।।

गरुडाची झेप घेऊन मी, उडत होतो आकाशात
दिपवून टाकले जगाला, प्रतिभेच्या प्रकाशात।। ४ ।।

स्वप्न डोळ्यात घेवून, शिखर जेव्हा गाठले
माझे यश पाहून, हे मित्रच जास्त नटले।। २ ।।

खूपच उंच गेलो, अगदी ऐपतीपेक्षा
त्या उंच भरारीने मात्र , माझी झाली हि दशा ।। ५ ।।

वेळ नव्हती आली, पण काळ येवून गेला
जिवंत ठेविले तरी , पंखच घेऊन गेला ।। ६ ।।

सुखाच्या काळात होते , जिकडे तिकडे मित्र
आता दुःख वाटून घ्यायला, कुणी नाही कुत्रं ।। ७ ।।

आनंदाच्या क्षणी माझ्या, सोबत होते सावलीसारखे
काळरात्र मजवर येता, आज झाले पारखे ।। ८ ।।

Tuesday, August 24, 2010

जगायचे आहे तर ..!!!!

जगायचे आहे तर
जगू पाखरा सारखे स्वच्छंद
आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा
लुटून घेऊ आनंद ।। १ ।।

जगायचेच आहे तर
जगून घेऊ फुला सारखे
अखंडपणे वाहणाऱ्या
नदीतील पाण्यासारखे ।। २ ।।

जगायचेच आहे तर
घेऊ एक गरुडझेप
कीर्तीरुपाने अमर राहू
पाठीमागच्या दुनियेत।। ३ ।।

जगायचेच आहे तर
कधी वृक्षवल्ली होऊ
शत्रू असो वा मित्र
सर्वांना प्रेम देऊ ।। ४ ।।

जगायचेच आहे तर
होऊ अंधळ्याची काठी
दुबल्यांनाही प्रेरित करू
उत्साहाने जगण्यासाठी ।। ५ ।।

जगायचेच आहे तर
कृतज्ञतेने जगूया
जीवनदात्या भगवंताला
असेच प्रेम मागुया ।। ६ ।।

Sunday, August 22, 2010

तुझ्याविना

मन माझे बावरलेले
लक्ष्य नाहि ठिकाणावर
कोठे नाहि दुसरीकडे
फ़क्त तुझ्या ओठावर १

नजर गेली हारून
समोर काहीच नसते
गालावारिल खळी तुझ्या
सततच मला दिसते २

कान जाले बधिर
ऐकू काही येइना
तुझी मंजुळ हाक
डोक्यातून जाईना 3

झोप गेली उडून
फ़क्त तुलाच पाहतो
तुझ नाव लिहित
नुसता पडून राहतो ४

जीवन झाले एकाकी
गेलीस तू निघून
असाच आता जगत आहे
तुझ्या “फोटोकड़े” बघून ५

Tuesday, June 15, 2010

बस झाले आता ....

बस झाले आता, हे खूप दिवस पाहिले
अशा परपोशी जगाला, डोक्यावर वाहिले

कीव नाही कुणाला, प्रत्येक जन झाला स्वार्थी,
स्वतः भ्रष्टचार करून, खापर दुसर्याच्या माथी

देवाला तरी सांगू म्हटले, गेलाय वचन देऊन,
पण खेदच करून आलो, त्यालाच बंदीत पाहून

गटार झालेय माणसांचे, म्हणून मी झटणार आहे,
सगळ्या जळमटाविरुद्ध, मीच आता पेटणार आहे