Friday, October 5, 2012

पोळ्याच्या दिवशी

{पोळ्याच्या दिवशी शहरात चाललेला धिंगाणा पाहून मी खूप दु:खी झालो होतो. मनात दाटलेल्या  त्या भावनांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न या कवितेत केला आहे.}

का कुठवर कुणाला किती कसे तोलू?
अंतरीचे जे बोचती ते बोल कसे बोलू?

एकेक लाट आता उभारी घेत आहे
झुळूक मंद ती हि असह्य होत आहे
धुंद अनोख्या तमात कशी नाव पेलू?
अंतरीचे जे बोचती ते बोल कसे बोलू?

मला टोचतो आहे मत्त नाच्यांचा बाजार
पवित्र परंपरेचा पहा कसा घेतला आधार
कर्कश गोंधळास का उत्सव मानुनी झेलू?
अंतरीचे जे बोचती ते बोल कसे बोलू?

बंदिस्त तरी श्रीमंत आधुनिक देव झाला
'मती ही न' तयांच्या भक्तीस पूर आला
गाभार्यात घडे पाप, ते कसे दूर घालू?
अंतरीचे जे बोचती ते बोल कसे बोलू?

कुठे ते दीपस्तंभ? ध्येय देवूनी का पळाले?
अर्ध्यावरी एकट्याचे त्राण माझे गळाले
वादळात 'प्रकाशाकडे'' कसा मार्ग चालू?
अंतरीचे जे बोचती ते बोल कसे बोलू?

No comments:

Post a Comment