Tuesday, November 6, 2012

अरे, देवा !

हृदयातच कोंडून घेणाऱ्या देवा! कधीतरी बाहेर येत जा ।
कोंडलेला श्वास तुझा अन माझाही, मोकळा करून घेत जा ।।

माझ्या हृदयातील अंधारात, एका बंद्यासारखा राहतोस ।
शेजाराला माझे षडविकार, तसेच राहू देतोस  ।।
अरे, तुझी राहायची जागा तरी, स्वच्छ करून घेत जा ।

कोंडलेला श्वास तुझा अन माझाही, मोकळा करून घेत जा ।।१।।

मी जातो हरवून वादळात, तेव्हा तुला तर असते ना दृष्टी!
अनाथाचा नाथ म्हणतोस , का नाही बनत माझी काठी ।।
अरे, खूप खोल आहे हा भवसागर, बुडत्याला आधार देत जा ।

कोंडलेला श्वास तुझा अन माझाही, मोकळा करून घेत जा ।।२।।

जेव्हा मला पडते खरी गरज, तेव्हाच दूर पळतोस ।
जीवा-शिवाचा खेळ म्हणे; मग एकटा का खेळतोस?
अरे, तु पण एखाद्या वेळी, खेळाचा डाव घेत जा ।

कोंडलेला श्वास तुझा अन माझाही, मोकळा करून घेत जा ।।३।।

मलाही मान्य आहेकी, तू सर्वांच्या हृदयी राहतोस ।
सृष्टी एवढा पसारा तुझा, तूच सर्व काही पाहतोस ।।
अरे, 'मी पण तुझाच अंश आहे', हि जाणीव तेवढी देत जा ।

कोंडलेला श्वास तुझा अन माझाही, मोकळा करून घेत जा ।।४।।




No comments:

Post a Comment